रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी युवा विद्यार्थी असोसिएशनचे आंदोलन   

पुणे : राज्यात शिक्षक भरतीसाठी २०२२ अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया दोन टप्प्यात करण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र ती प्रक्रिया अपूर्ण असून याच्या निषेधार्थ युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात आले आहे. लाखो युवक-युवतींनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले; परंतु जिल्हा परिषदांच्या पवित्र पोर्टलवर भरतीसाठी जागा न देण्याच्या धोरणामुळे त्यांची स्वप्ने आता उद्ध्वस्त होत आहेत. शासन व शिक्षण आयुक्त कार्यालयाने शिक्षक भरतीबाबत निर्देश जारी केले. मात्र, जिल्हा परिषदांकडून पहिल्या टप्प्यातील १० टक्के पद कपात केलेल्या जागा, रिक्त, अपात्र आणि गैरहजर जागा पवित्र पोर्टलवर भरतीसाठी दिल्या जात नाहीत.
 
या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. संघटनेने म्हटले आहे की,  उन्हातान्हात रात्रंदिवस रस्त्यावर बसून आमच्या हक्काच्या नोकरीसाठी आम्ही याचना करत आहोत. अपार संघर्ष करून आम्ही शिक्षक होण्यासाठी पात्रता मिळवली आहे. आमच्या पालकांनी आमच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, मात्र जिल्हा परिषदांच्या अन्यायकारक धोरणामुळे आमच्या नोकरीच्या आशा मावळत चालल्या आहेत. 
 
युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष तुषार देशमुख यांच्यासह बाळासाहेब काशीद, संदीप कांबळे, विजय यादव, मनीषा सोनवणे, राकेश तुरंकर, प्रदीप नागेश, मुकदम पवार, अमोल कदम, बळवंत शिंदे, नितीन वाळके, अर्जुन पवार, रुपेश तहसीलदार, संकेत मिर्झापुरे, अश्विनी राठोड, हेमांगी सावंत, दयानंद मारकवाड, भगवान डोईफोडे, खंडू शेवाळे, सोनाली कांबळे, मनीषा गव्हाणे, प्रियांका पाटील, सुरेखा पाटील, परमानंद खराटे आदींचा आंदोलनात सहभाग आहे.

Related Articles